आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई,
तुझ्याविना पण जगावयाचा सराव नाही आई
एक तुझे ते असणे होते एक तुझे हे नसणे,
या जगण्यावार दुसरा कुठला प्रभाव नाही आई....
©वैभव जोशी.
ठेव बाजूला तुझ्यातिल देव आई
जेवले आहेत सारे, जेव आई…
© वैभव जोशी
जळते दिव्यातली ती होऊन वात आई
अन दाटल्या तमावर करतेच मात आई
ना मंदिरात कुठल्या,ना देवळात आहे
आईत देव आहे...देवा तुझ्यात आई...
©अनिता बोडके
कधी सांग कळले कुणाला इथे हे
भरडते कशी दुःख जात्यात आई
©महेश जाधव
हात धरुनी चालणारा ईश्वरी आभास आई
जन्म अख्खा भोवताली रुंजण्याचा ध्यास आई
अर्धपोटी राहुनीही घोर पिल्लाच्या भुकेचा
बाजुला काढून अर्धा ठेवलेला घास आई....
आनंद
जेवलो नाही जरी मी, झोपते ताई उपाशी
मागच्या जन्मातली ती वाटते आई असावी..
© अब्दुल लतीफ
घर सोडुन पण जातो देव
त्या देवाचे नाव बहिण...
©अब्दुल लतीफ.
गोष्टी अजून आजी जगते नव्या नव्याने
सांभाळते किती क्षण चंचीत पावसाचे ?...
अनिल विद्याधर आठलेकर
भुका लागायच्या तेव्हा धपाटे द्यायची आजी
तसे आणायची चोरून पोहे भांडकी ताई
.
नशेने बोचली जाणीव दु:खाची प्रकर्षाने
तुझ्या चौथ्याच दिवशी बारमध्ये प्यायलो आई....
बेफि़कीर'.
स्वर्गाहुनही होती सुंदर माझी आई
मायेचे लखलखते अंबर माझी आई
.
दारी आलेला तृप्तीचा ढेकर देई
प्रेम भुकेल्यासाठी लंगर माझी आई…
बाळ पाटील
कधीही अशी वेळ येऊ नये की,
नसावी पिलांनाच घरट्यात आई
महेश जाधव
जेवढी देशील चावी तेवढा नाचेन मी
खेळण्याच्या भावनांची तू नको चिंता करू…
भालचंद्र भुतकर
घराचे एकटेपण खायला उठते
अता आई स्वत:शी एकटी हसते
.
कुठे येतो सणाला न्यायला मामा
मला सुट्टी दिवाळीची छळत बसते …
गणेश नागवडे
भिंती सा-या पडून गेल्या आई
डागडुजीला आता बाबा नाही…
गणेश नागवडे
वाटणी झाली मिळाली उत्तरे सगळी
प्रश्न पण कायम उगाचच माय-बापाचा..
गणेश शिंदे
बांधते पदरात हासू..मी कुठे काही म्हणालो
बोललो काहीच नाही फक्त मी आई म्हणालो…
© गौतम राऊत
भाऊ हवा कशाला संरक्षणास माझ्या
माझाच मी स्वतःला आधार होत आहे…
©किर्ती वैराळकर इंगोले
गुदमरतो श्वास इथे गं जगणे मज अवघड जाई
मी अंश तुझ्या देहाचा गर्भात पुन्हा घे आई....
©किर्ति वैराळकर इंगोले
करतेस का अलग तू बघ ना आई
मी तुझीच ना मग.. तू बघ ना आई
.
तू नजर फिरवली.. वाट्याला आला
दुष्काळ हा सलग .. तू बघ ना आई….
ममता सपकाळ
वाटणी तू खुशाल कर भाई
पण मला वाटणीत दे आई..
.©मसूद पटेल
कोणी नाही केली माया तुझ्यासारखी आजी
पुन्हा एकदा भेटशील तू कुठल्या गावी आजी?
.
कुठल्याही प्रश्नाचे उत्तर तिला ठाऊक होते
मला कळेना कुठली शाळा शिकली होती आजी
.
तुझ्याकडे पण नव्हती देवा तिच्यासारखी कोणी
म्हणून देवा आवडली ना तुलाच माझी आजी..
© मनिषा नाईक
हळवी स्वप्ने माती वरती रांगत नाही,
म्हणून आता घरात घरपण नांदत नाही
.
उजेड देणारी ती झाडे विझून गेली,
घरात आता आजी गोष्टी सांगत नाही...
©नितीन देशमुख.
तिला समजते धांदल माझी हसणे रडणे सुद्धा
आई इतके अजून कोणी ओळखणारे नाही
.
बस इतक्यातच गेली आजी आजा गेल्यानंतर
त्यांच्या नंतर कुणी उराशी कवटळणारे नाही...
©राधिका सूर्यवंशी फराटे
पुन्हा परतून ये आजी तुला बिलगायचे आहे
खिलाडू बालपण बटव्यातुनी चोरायचे आहे...
©राधिका फराटे
नवनव्या प्रतिमेत आली माय माझी
कैकदा गझलेत आली माय माझी
.
का उगा पूजा करू मी ईश्वराची ?
काळजी जर घेत आली माय माझी...
©रमेश बुरबुरे
आस पण वृद्धाश्रमी आईस का ही वाटते ?
घ्यायला येईल माझे लेकरू केव्हातरी…
© राम रोगे
आई पेक्षा ही धावून बाप आला
जेव्हा पोरीला भरपूर ताप आला…
©सिद्धार्थ धुळध्वज
उंबरठ्याची सीमारेषा म्हणजे आई
भिंती, छप्पर, ऊब घराची असते आई
.
कोठे ही जा सगळ्यांना ती सोबत करते
ह्रदयाच्या गाभा-यातुन धडधडते आई
©शोभा तेलंग
आई नाही ऐसी जागा कोठे नाही
शोधू जाता वाटे ती तर घरभर आहे
.
आई पान्हा, आई माया, आई अमृत
प्रत्येकाची आई छाया जगभर आहे.
©शोभा तेलंग
मुद्दाम एक भांडे भांड्यास लागते
माझ्या हुशार भावा आता विभक्त हो...
©सतीश दराडे
माय म्हणते जेवणाची सोय नाही
बाप माझा भीक मागू देत नाही
©डॉ. श्रीकृष्ण नारायण राऊत
बाबास ठेव येथे,आई तुझ्याकडे ने;
वृद्धापकाळ त्यांचा पोरात वाटलेला.
© श्रीकृष्ण राऊत
पिशवीमध्ये एकच पालेभाजी आहे
निघून गेल्या दिवसांची सय ताजी आहे
.
झाड जुने वठलेले परसामधे उभे हे
जणू बैसली गोष्टी सांगत आजी आहे...
© सुप्रिया मिलिंद जाधव
भावा भावांची भांडणे झाली.
आई बापाच्या वाटण्या झाल्या...
©संतोष सावंत
'लेकीचे' साधे पडसेही बघवत नाही आता;
आई होता आईचे 'आईपण' कळले आहे….
© सुहासिनी विवेकरंजन देशमुख
माझ्या घरास शोभा आईशिवाय नाही
दुसरी पवित्र जागा आईशिवाय नाही
आहे जरी अडाणी ती आज शिक्षणाने
मोठा गुरूच कुठला आईशिवाय नाही …
© संतोष शेळके
हे ॠतू सहाही जळणे आयुष्याचे
'आई' हे धगधगणाऱ्या समिधेचे नाव..
©संजय गोरडे
तिला सोडुनी लेक शहरात आला
तरी पाहते वाट खेड्यात आई
©महेश जाधव
आई अमृताची नदी, बाप अथांग सागरं
आई पक्वान्नाचे ताट, बाप मीठ चवदार
.
आई वात्सल्याची मुर्ती , आई मायेचा पदर
बाप खांब मजबूत , उभे ज्याच्यावर घरं....
© उज्ज्वला सुधीर मोरे
प्रत्येक लेकराच्या असते मनात आई
का राहते तरीही वृद्धाश्रमात आई ... ?
© विश्वास रघुनाथ कुलकर्णी.
संकलन-देवदत्त सांगेप
0 टिप्पण्या