=================================
हळवी स्वप्ने माती वरती रांगत नाही,
म्हणून आता घरात घरपण नांदत नाही.
उजेड देणारी ती झाडे विझून गेली,
घरात आता आजी गोष्टी सांगत नाही...
अंगणातल्या गुलबासाचे वारस मेले,
कुंपणातली मेंदी आता लाजत नाही...
स्वप्नांचा तर वेग वाढला खूप परंतु,
धुळीतल्या रस्त्याहुन दमणी धावत नाही..
जो तो येथे उघडा करतो ज्याला त्याला,
पदराखाली कुणी कुणाला झाकत नाही..
टिव्हीत नाचे जाहिरात भक्तीची आता,
म्हणुन बिचारा विठू किर्तनी नाचत नाही...
वेडी झाली दुनिया वेडे झालो आपण,
फक्त धावतो क्षणभर कोणी थांबत नाही..
अभिमानाची सूज एवढी वाढुन गेली,
स्वतःच आपण स्वत:त आता मावत नाही..
=================================
=================================
संस्कार सभ्यतेचा झालाय फास हल्ली
इतका भलेपणाचा होतोय त्रास हल्ली...
झाडावरी भरवसा उरला न पाखरांचा
बुंध्यातुनी कटाचा येतोय वास हल्ली.....
विश्वास पूर्ण जळला वणव्यात मतलबाच्या
मित्रात दुश्मनाचा होतोय भास हल्ली....
मुल्ये,दया क्षमा अन शांती कुठे हरवली
बुध्दा,खरेपणाचा झालाय -हास हल्ली...
होते उगाच जपले,आता कळून आले
मानव्यता वगैरे निष्पर्ण ध्यास हल्ली...
उलट्या घड्यास सांगा आहे रिता बरा तू
भरल्या घड्यास झाला अभिमान खास हल्ली..
अस्वस्थताच माझी घेईल जीव माझा
देहास भार झाला एकेक श्वास हल्ली..
जंगल सुधारण्याचा सोडून मोह आता
घरट्यात मी सुखाचा घेतोय घास हल्ली..
=================================
रुजण्यासाठी नात्यांची पांघरतो माती,
मी मातीच्या ओझ्याखाली दबून जातो..
उगा स्वत:ला कमळ कशाला म्हणून घेऊ
पण प्रेमाच्या चिखलामध्ये रुजून जातो..
मला न कळला अजून माझा स्वभाव पुरता
फुलास कळतो पण दगडांना रुतून जातो..
समृध्दीच्या मार्गावरती..भरकटलो मी..,
मने जिंकण्यासाठी रस्ता कुठून जातो..
=================================
दचकून रात्र उठली,कुठला प्रहर कळेना..
स्वप्नात अमृताचे झाले ,जहर कळेना...
संग्राम माणसांचा हा तर जुनाच मुद्दा...
होणार कोण जाणे कुठला कहर कळेना...
उध्वस्तसा किनारा स्वप्नात पाहिला मी...
तख्ता सभोवताली कुठली लहर कळेना..
परकोट फोडुनी बघ शत्रू घरात घुसला
का झोपलेच आहे अजुनी शहर कळेना
होतील का समांतर, कविता गजल रुबाया...
व्याली विचित्र अनवट,कुठली बहर कळेना
=================================
================================
टकराव स्पंदनांचा श्वासातल्या विजांचा
जयघोष चालला हा मस्तावल्या ढगांचा
हे दोन देह आता नुसतेच देह नाही
संघर्ष चालला हा सृजनातल्या फळांचा
नव पूंज तारकांचा रंध्रात पेरला मी
गर्भात मृत्तिकेच्या गर्भाळल्या कणांचा
उन्माद जीवघेणा सृजनात भोगला तू
आनंद भोगला पण त्रासातल्या कळांचा
वैराग्य एक वेळा आले तुझ्या मनाला
हव्यास हा नको रे मदनातल्या सणांचा
आई म्हणेल तुजला क्षितीजा वरील तारा
तेव्हा विसर पडावा शुन्यातल्या क्षणांचा
मी भक्त चंदनाचा गंधात रोज न्हातो
मी बाप जाहलो ना गंधाळल्या फुलांचा
=================================
विष मनातील साफ करावे असे वाटते;
चल सगळ्यांना माफ करावे असे वाटते.
दो श्वासांची अंगत पंगत जगणे अपुले;
काय उगा संताप करावे असे वाटते.
हा द्वेषाचा तरंग अडवू हृदयतळाशी;
का चिंध्यांचे साप करावे असे वाटते.
जगण्यामध्ये आनंदाचा पाउस पडण्या;
या दु:खाला वाफ करावे असे वाटते.
प्रेम कधी का मोजुन मापुन करता येते;
का हृदयाचे माप करावे असे वाटते. ...
=================================
रुजण्यासाठी नात्यांची पांघरतो माती,
मी मातीच्या ओझ्याखाली दबून जातो..
उगा स्वत:ला कमळ कशाला म्हणून घेऊ
पण प्रेमाच्या चिखलामध्ये रुजून जातो..
मला न कळला अजून माझा स्वभाव पुरता
फुलास कळतो पण दगडांना रुतून जातो..
समृध्दीच्या मार्गावरती..भरकटलो मी..,
मने जिंकण्यासाठी रस्ता कुठून जातो..
=================================
=================================
हजार कपडे बदलुन झाले,नूर बदलला नाही,
शेतक-याच्या डोळ्यामधला पूर बदलला नाही,
आले उजवे,आले डावे,गांजरवाले पावे....
किती बदलल्या सत्ता,तरी ही,सूर बदलला नाही..?
=================================
मी माझ्या आईच्या पायापाशी असतो,
म्हणुन कुणाचा द्वेष कराया शिकलो नाही.
=================================
बाप म्हणुनी शाळेमध्ये तुला पाठवीत असतो..
दप्तरात मी बाळा तुझिया स्वप्न साठवीत असतो..
=================================
मंदिरांना भार झाला दौलतीचा, झोपड्यांना देणग्या का देत नाही?
का उधारीत पथ्थरांशी भाव करता, पुण्य हे नगदीतले का घेत नाही..!
=================================
मी गजल का गात आहे....
मी तिच्या प्रेमात आहे.....
=================================
जगाच्या थंड नजरांनी किती सर्दाळलो होतो..
तुझ्या उबदार स्पर्शांनी मला सांभाळले होते..
=================================
माझी तिची अचानक स्वप्नात भेट झाली...
फिरुनी हुदय जळाले फिरुनी नजर मिळाली.....
=================================
तसा जगतोच आहो मी, स्मृतिंचे मोगरे घेवून,
तुझ्या श्वासात प्रेमाने, कधी जे माळले होते..
थोडी थोडी सर्वांपाशी गरळ आहे....
माहित आहे निवडणूक ही जवळ आहे..
नाग विषाचे थैले घेवुन फिरत आहे...
नकोच सांगू कोण केवढा सरळ आहे
=================================
जुने सरकार का पडले तसे झाले बरे झाले...
नवे सरकार ही कळले तसे झाले बरे झाले..
जरासा वाढला कांदा जराशी तूर भडभडली
किती सरकार गडबडले तसे झाले बरे झाले..
=================================
देश ज्याच्या मालकीचा
आज तो रानात आहे......
मी जरी शहरात आलो
जीव का गावात आहे.....
=================================
कसले फसवे हे रणकंदन
चर्चा ठरते केवळ रंजन
निवडणुकांच्या तोंडावरती
उकरुन काढी विषय पुरातन
खूप बोलता काही न करता
सदाकदा बस पोकळ भाषण
सोड बिजेपी अन कॉंग्रेसी
मानवतेचे कर संवर्धन...
आपसातले नाते टिकवा
चुलीत घाला पक्ष समीक्षण
=================================
=================================
बंगले माडी गाडी घोडी इथेच राहील तेव्हा
तुझ्या आतली मुख्य चेतना निघून जाईल जेव्हा
=================================
मृत्यू ला ही समोर ठेऊन कर जगण्याचा उत्सव
श्वास श्वास मग वैराग्याचे गाणे गाईल तेव्हा....
किती जीव या पृथ्वीवरती बघतो आपण..
माणुस सोडून कुणीच का बरबटले नाही
व्यथा गोंजारली होती,मरण कवटाळले होते..
तुला मी टाळले नव्हते,स्वत:ला जाळले होते..
=================================
मुक्याने आसवे तेव्हा,फुलांनी गाळली होती..
कळ्या अस्वस्थ होत्या अन, दगड ओशाळले होते..
ऐकला आवाजही मी पाकळ्यांचा..
फूल माझ्या एवढे जवळून गेले...
=================================
माझे करायचे ते आता करून घे तू.....
हसणे तुझ्या हवाली अश्रू तुझ्या हवाली..!!
=================================
मी तृप्तिची सांगत नाही भक्त्तीगाथा..
व्याकुळतेच्या भासांनाही अर्थ असतो
तू उजेडाची कशाला वाट बघतो..
सूर्य त्यांनी ठार केला मध्यरात्री....
=================================
इथे असे डाव फेकती शहाणे....
चितेवरी हात शेकती शहाणे.....!!!!!
=================================
एक वेळा बोल काही...
बोल ना अनमोल काही..
तू मला बघतेस जेव्हा...
रुतत जाते खोल काही...
=================================
=================================
मदमस्त अंगुराचे पाणी भरात आहे
गाडी हळूच हाका ज्वानी भरात आहे
डाळींब हा गुलाबी भरला कणा कणाने
रसदार या रुपाच्या खाणी भरात आहे
=================================
मायच्या पोटात होते वाढ केवळ...
जन्मल्यावर माणसाची झीज होते...!
=================================
जळणा-याला विस्तव कळतो बघणा-याला नाही
जगणा-याला जीवन कळते पळणा-याला नाही
जात्या मध्ये जीव देऊनी घास मुखी जो देतो
त्या दाण्याला जीवन कळते दळणा-याला नाही
=================================
0 टिप्पण्या