फिका केवढा गूळ वाटला संक्रांतीचा
ओठांवरची तीळ एवढी गोड वाटली...
©अमित वाघ.
तितका तिळ तिळ तुटतो माणुस
लांब राहते जितके जीवन .
©अमित वाघ
तुला संधी मिळाली ओठ पुन्हा गोड करण्याची,
तुझा तिळगूळ देण्याचा बहाणा चांगला होता.
©अमोल शिरसाट
ती खळी, डोळे, गुलाबी गाल.. होते का कमी?
त्यापुढे तो तीळ आहे...आणि त्या खिंडीत मी!
© अनिल विद्याधर आठलेकर
तुला मी तीळ म्हणते अन मला तू गुळ म्हणशी जर
मिसळूनी जाऊया दोघे अता संक्रांत आली तर ..
©अमृता साळुंके जोशी
तिच्या गालावरी ती खळ अहाहा तीळ ओठावर
असे सौंदर्य तर राजा तुझ्या राणीतही नाही....
©आबेद शेख
तुझ्या गाेड गालावरचा सखे तीळ दे उधार
तुझा मी तुला परत करील हाेताच गं पगार...
©अरविंद पाेहरकर
चांदण्यांचा तिच्या तीळ गालावरी
दृष्ट काढावया चंद्र ओवाळतो...
©अरुण सांगोळे
तीळ माझ्या की तुझ्या ओठांस आहे
हे ठराया आणखी जवळून पाहू..
.©आनंद पेंढारकर
तिच्या ओठावरी तो तीळ जेव्हा पाहतो मी
मला मग वाटते की आजही संक्रांत आहे ...
©भैय्या पेठकर
आमुचे नाते जिवाला भावते या
तीळ आहे मी बघा ती गूळ आहे
©ज्ञानेश्वर कटारे
जन्मभर गोड गूळ होता तो ..
माणसांचेच कूळ होता तो ?...
© दास पाटील
नको घेऊस माझ्या आळ ओठांवर
तुझा शाबूत आहे तीळ ओठांवर…
©धनंजय तांदळे
अनुस्वार आहे नंतरच्या शब्दामध्ये
तीळ तिच्या गालावरचा आठवेल आता..
©गोविंद नाईक
सवय तूच लावलीस भलती ओठांना माझ्या
गोड कसे व्हायचे तोंड हे फक्त तिळगुळांनी?.
.© गोविंद नाईक
[ तीळ-गूळ मराठी शायरी ]
गुळाला तीळ लावावा तसे द्यावे तिने चुंबन
मला संक्रांत भेटावी अशा हळुवार ओठांनी...
©गणेश नागवडे
तुझ्या तीळगूळ देण्याने निकाली प्रश्न निघाला..
तुझ्या घराकडे नेहमी,उत्तरायण सुरू आता ...
©गणेश_शिंदे_दुसरबीडकर.
सुधारसाची मधुर काकवी चाखत आहो दोघे
तीळ गुळाच्या विनाच अपुली संक्रांत होत आहे...
©हेमलता पाटील.
तिळाची स्निग्धता स्पर्शी ,गुळाचा गोडवा ओठी
तुझ्या भेटीमुळे संक्रात रोजच साजरी होते
©जयश्री कुलकर्णी
तू गालावरचा तिळ
तू ओठावरची शिळ..
.© कविता ननवरे
असा ना कसेही ! गोड बोला
गळाही चिरा पण गोड बोला
तिळा साखरेचे भाव ज्यादा
विना साखरेचे गोड बोला...
कविता डवरे
आलिये संक्रात दारावर पुन्हा
एक आहे तीळ गालावर बघू..
.©ममता सपकाळ
का उगीच अंग अंग चोरशी
तीळ वेचतॊ लहानसाच मी...
©म.भा.चव्हाण
तीळ हनुवटीवरचा दिसतो उठुन चेहऱ्यावरती
महिरप सजते कुरळी कुरळी रुंद कपाळावरती..
© मानसी चापेकर
जरी वाढले अंतर अपुल्या दोघामधले.
प्रेम तरीही तिळभर अजुनी घटले नाही...
©नितीन देशमुख.
चेहऱ्यावर बेगडी ओघळ कशाला
तीळ असल्यावर हवे काजळ कशाला...
© निलेश कवडे
जणू गालावरी सजला असावा तीळ नाजुकसा
तशी वाट्यास माझ्या नित्य आली चांगली दु:खे...
©नचिकेत जोशी
रोजला आशा नका ठेवू दिवाळीची
राहुद्या लक्षामधे संक्रांत येते ती…
©प्रमोद खराडे
तिळ ओठांचा तुझा तो मागण्यासाठी गझल
अंतरी आकांत जो तो मांडण्यासाठी गझल.
.©पियुष खांदेश्वर.
तीळ भोळा लाडकीशी बट दिसे
पापण्यांच्या आत सुध्दा कट दिसे..
.©राधिका फराटे
तिळावर गुळ ओठांनी जरासा ठेव प्रेमाने
अशी संक्रांत ही माझी सख्या दरसाल होऊ दे...
.©राधिका फराटे.
सर्व बिघडली चव तोंडाची
काढ जवळचे गूळ फुटाणे..
©राहुल गडेकर
जगा वाटला मी तुला गूळ माझा;
मला फेकले तू चिपाडाप्रमाणे...
© श्रीकृष्ण राऊत
अजून आठवे मला सुरेख तीळ सावळा;
अमीट खूण ती तुझी सखे उरात राहिली...
श्रीकृष्ण नारायण राऊत
ओठावरचा तीळ सांगतो
उपवासाला तीळ चालतो..
©स्वाती शुक्ल
पाहिला मी सहज जेंव्हा तीळ गालावर तुझ्या
मन पतंगासारखे मग दूर गेले भरकटत..
©स्वाती शुक्ल
तुझे हे तीळ आणि गूळ शेखर काय कामाचे
मनातिल द्वेष लोकांच्या कधी संपायचा नाही..
.©शेखर गिरी
उबदार स्नेहाची मिठी ओठात गोडी नेहमी
मी गारव्याला मागतो कायम सुखांची या हमी ..
.©सीमा गादे
हासतो तो तीळ गालावर तुझ्या अपरोक्ष वेडे
कैकदा स्पर्शूनही तो भावनांना टाळ म्हणतो..
©सीमा गादे
होतो ओव्हरडोस आणि मग हँगोव्हरही उतरत नाही
ओठाखाली तीळ कशाला तिला लाभला समजत नाही.
©शिवानी गोखले
तीळ नको गूळ नको वेळ द्या.
गोडं नको कडू नको शब्द द्या..
© सुचरिता
जर हवा चांगला सोबती
घेवुनी जा मला सोबती
तीळ म्हणतो कशाला तुम्ही ?...
आठवा आणला सोबती ...
©सुरेश इंगळे
तीळ ओठांचा तुझ्या मी चुंबतो अन्
छान होते साजरी संक्रात माझी...
©संतोष शेळके
पोटात जहर त्यांच्या ओठात गूळ आहे
सांभाळुनी चला रे पाणी गढूळ आहे.. ..
©सुधीर इनामदार.
जिकडे होते गूळ खोबरे
तिकडे गेले सर्व सोयरे....
© सुधीर इनामदार
स्वप्नाळू खोल डोळे अधिर ओठ किती
हनुचा तीळ काळा नजरेची नाही भीती..
© तुषार जोशी तुष्की
ओठांवर तिळ कसला हृदयावर वार जणू
या रूपखजिन्याचा तो राखणदार जणू..
©तुषार जोशी तुष्की
तुझ्याशी गोड बोलावे अशी का आर्जवे त्याची
मुळातच तीळ म्हटले की तुझ्या गालावरी येतो...
©विजय उतेकर.
तुझ्या रोज गाली सही चंद्र करतो
तरी तीळ शंका धरु देत नाही...
©विजय आव्हाड
जर विचारानेच झाली जिंदगी उत्क्रांत येथे
मग मकर संक्रांत कसली कोण करतो तीज मित्रा..
©विनोद बुरबुरे

0 टिप्पण्या