कुठलीशी चळवळ दिसते
नुसतीच पळापळ दिसते
मी रागवणारच नाही
ही त्याची अटकळ दिसते….
©ममता सपकाळ
=================================
सात जन्मांनी मला व्यापून होवू दे
उत्खनन नंतर तुझ्या हातून होवू दे
तू जवळ आलास की अनुमान काढूया..
तोवरी परिणामही लांबून होवू दे....
©ममता सपकाळ
=================================
तो आला, पोहला, पोचला पैलतिरावर
केव्हाचा अदमास घेत मी उभा किनारी...
© मिलिंद छत्रे
=================================
खरेतर मी जसा होतो, तसा आहे
तुझा अंदाज चुकला यार,मी नाही…
© निशब्द देव
=================================
दूर दूरवर जाती नजरा रोज पावसा;
किती तर्हेीने तुझी करावी सदैव अटकळ?...
© प्राजक्ता पटवर्धन
=================================
सांभाळतोय मर्जी निशब्द मोसमाची
मी बोलक्या फुलाचा अंदाज घेत नाही...
© रूपेश देशमुख
=================================
ठरले किती निरर्थक अंदाज जीवनाचे
केले वजा तुला अन् चुकला हिशेब सारा....
रत्नमाला शिंदे
=================================
जपल्याने टिकले आहे का कुठले नाते ?
अमर असे येथे दिसले का कुठले नाते ?
.
नात्यांनाही श्वास असावा.. अटकळ माझी
सहवासाने गुदमरले का कुठले नाते ?...
©ऋतुजा शुभांगी
=================================
या फुलांना या ऋतुंना घेउद्या अदमास माझा
यार हो,अद्याप नाही संपला मधुमास माझा…
©सुरेशकुमार वैराळकर
=================================
सेतू तसा नवा, पण हा कोसळेल केव्हा
याचा अचूक पक्का बांधा कयास राजे…
© श्रीकृष्ण राऊत
=================================
करता मला न ये जे इतरांस येत नाही
पण यामुळेच बाधा जगण्यास येत नाही
.
इतके विचित्र आता जग वागते इथे की
अपुल्याच वर्तनाचा अदमास येत नाही …
©सिद्धार्थ भगत.
=================================
चालणे आहे किती बाकी कसे सांगू तुला मी
चालणारा तूच तर मग लाव ना अदमास देहा…
©सदानंद बेंद्रे
=================================
ते कितीसे कोडगे अन मी किती निर्ढावलेला
आंधळे अदमास त्यांचे अन मला अंदाज नाही…
©सदानंद बेंद्रे
=================================
कुठे आहोत आपण नेमके समजून घेऊ
कहाणी आपली नंतर जरा बदलून घेऊ
नको ते उंट, त्या शेळ्या, नको ते हाकणेही
अता अंदाज पाण्याचे स्वतः उतरून घेऊ…
©सदानंद बेंद्रे
=================================
अंदाज सांगतो माझा, कुठलाही दावा नाही
मृत्यू अनवाणी फिरतो, वाजवत खडावा नाही.
©सदानंद बेंद्रे
=================================
होईल दूर आता अंधार जीवघेणा
सूर्यास एक माझा अंदाज सांगतो मी…
©शंतनु कुलकर्णी
=================================
बा विठोबा वागण्याला कोणते परिमाण लावू,
तू खरा कि मी खरा रे कोणते अनुमान लावू
©संतोष वाटपाडे.
=================================
"बोलणाऱ्यांचे इथे शिरकाण होते...
शांततेचा वेगळा अंदाज आहे"..
संजय गोरडे
=================================
झाली जिथे चुकामुक, तेथेच थांबलो मी
तेव्हा तुला नसावा अंदाज फक्त आला!....
©सौभद्र
=================================
केवढे छळलेस तू दरम्यान आयुष्या
शेवटी झाली किती धुळधान आयुष्या
.
फोल ठरले देव,दानव,शास्त्र अन् ज्योतिष
नेमके नव्हते तुझे अनुमान आयुष्या...
©संतोष वि.कांबळे
=================================
तू पुन्हा येशील हा अंदाज नव्हता बांधला
मग पुढे गेलोच नसतो वाट ओलांडून मी...
© सुधीर सुरेश मुळीक
=================================
थांबले आयुष्य आहे.... श्वास नाही
सोडलेला घास आहे... ध्यास नाही
मी दिलेला शब्द म्हणजे शब्द आहे
भोंगळे अनुमान वा अदमास नाही.
© प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी
=================================
ही दुनिया म्हणजे निव्वळ वेड्यांची दुनिया आहे
ही माझी खात्री आहे, ही माझी अटकळ नाही…
© अनिल विद्याधर आठलेकर
=================================
जगण्याचा हव्यास कशाला ?
श्वासांनाही त्रास कशाला ?
अडखळण्याची असेल व्याधी
प्रेमाचा अदमास कशाला ?...
©आनंद पेंढारकर
=================================
मज वाटले,असावे सारेच आपले पण
कळले किती खुळा हा माझा कयास होता....
©अनिता बोडके
=================================
लपवून ठेवलेले त्यांनी वयास होते
अंदाज लावतांना केले प्रयास होते...
#अलका_देशमुख
=================================
दिसणार ना कधी तो ऐसा कयास होता
सुर्यास झाकण्याचा त्यांचा प्रयास होता
.
हा जो निगूढ आत्मा आहे स्वयंप्रकाशी
त्याला कुणी न येथे उजळावयास होता....
©बाळ पाटील
=================================
जे मी बोलुन गेलो तो अंदाज समज
जे मी बोलत नाही तो दावा आहे…
© चंद्रशेखर सानेकर
=================================
भलता सताड उघडा अज्ञातवास माझा
बघ लागतो तुला का आता तपास माझा
मातीच वांझ इथली की षंढ हे बियाणे
पाऊस जोखण्याचा चुकतो कयास माझा ...
© दास पाटील
=================================
नक्की नसते कुठे कोणता निघेल रस्ता
मुक्कामावर सुद्धा दुसरा मिळेल रस्ता
आरंभाची वा अंताची नसेल अटकळ
या दुनियेला केवळ समजत असेल रस्ता...
©दत्तप्रसाद जोग
=================================
'ती' यायचा बरोबर अंदाज घेत असते.
बहुतेक हृदय हल्ली,झालेय वेधशाळ
.©गोपाल मापारी.
=================================
पायात बेड्या जुन्या रुढींच्या;
उडण्यास अटकळ जराजराशी...
©हेमलता पाटील
=================================
निर्णय घेण्या सक्षम तूही आहेस जरी
तरी कधी मी अंदाज तुझा ढोबळ झाले..
©सौ.हेमलता पाटील
=================================
अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा…
©इलाही जमादार
=================================
रस्ता तुला नेणार कोठे?
अंदाज नसतांना दिशांचा
अंदाज चुकला तर चुकू दे
अंदाज येइल एकदाचा...
© इंद्रजित उगले.
=================================
किती अपेक्षाभंग पचविले
नकाच बांधू आता अटकळ…
©कालिदास चवडेकर
=================================
दावतो अशक्य शक्यता मना, जीवास तू
सिद्ध तू नसूनही जगात एक खास तू
हे तुझे नसूनही तुझेच व्यापणे किती
वाटतोच नेहमी मला तरी कयास तू..
©कमलाकर देसले ‘आबा’
=================================
वाटे असेल काही अस्तित्व सावलीला
कोठे, कसे, किती हा अदमास सोसवेना…
© क्रांति साडेकर
=================================
नको अमावस रोज दिसो, इतकीच अपेक्षा माफक असते
दरदिवशी बदलत जाणा-या चंद्राच्या हे गावी नसते
.
उभ्या-उभ्या पारखू नये हे उठता-बसता सांगत होते
हिरा-खडा ओळखण्यामध्ये भल्या-भल्यांची अटकळ फसते..
@सुप्रिया
=================================
दुथडी भरून वाहे ओंजळ
कसे म्हणू दु:खाला पोकळ
.
आत-आत मन पोखरलेले
वरून कोठे येते अटकळ
© सुप्रिया मिलिंद जाधव
=================================
गर्दीमध्ये खळबळ झाली
क्षणैक थोडी वळवळ झाली
.
देव असावा देव नसावा
ही तर केवळ अटकळ झाली…
© सौ. सविता ताई गाढवे
=================================
जीवनाने घेतला अंदाज आता,
मागतो माझा मला तो आज आता…
©शरद बाबाराव काळे
=================================
तुझी माझी कथा पाऊस पाण्याची
सरी होऊन ये अटकळ नको ठेवू…
©समीर येवले
=================================
सभोवताली, तुझीच हिरवळ!
तुझ्या स्म्रुतींचा, मनात दरवळ
खुशाल आता, खुलून घेवू
कशास शंका? कशास अटकळ?
विनोद_अग्रवाल
=================================
कुठे कुणी का उदास आहे
बरीच चिंता जगास आहे
मनातली संपली निराशा
उगाच वेडा कयास आहे..
©वर्षा बेंडिगेरी कुलकर्णी
=================================
प्रत्येक क्षण सुखाचा इतका झकास असतो
आयुष्य वेदनेचा सरता प्रवास असतो
आलेख जीवनाचा चढतो कधी उतरतो
अदमास लावण्याचा नुसता प्रयास असतो
©वैशाली शेंबेकर मोडक
=================================
होती समान अपुली प्रेमात भागिदारी
वाटे अधांतरी हा माझा कयास झाला…
©योगिता पाटील
=================================
0 टिप्पण्या