------------------------------------------
१.
ठेवले मी घाव माझ्या आत काही
आपल्यांचे पोसले आघात काही
लालसेने उत्तराच्या झोपलो, पण
बोलली नाहीच ती स्वप्नात काही
भेटला तुकडा वराला काळजाचा
भेटले नाही म्हणे लग्नात काही
"मी सुखी आहे, विसर आता मला तू"
तू कधी लिहिले असे पत्रात काही?
फोनवरती 'कोण?' म्हटल्यावर समजले
राहिले नाही अता नात्यात काही
मागते निष्ठा तिचेही हक्क जेव्हा
फक्त आली आमिषे हिश्यात काही
यार तू सांगू नको मज लोकशाही
वेगळे पोटात अन ओठात काही
धावली नाहीच बहुदा कासवेही
झोपले होते ससे रस्त्यात काही
------------------------------------------
२.
कोणता माणूस आहे आत माझ्या
मी म्हणूनच आत नाही जात माझ्या
मी स्वतःला रोज देतो हाकलूनी
मीच असतो मग पुन्हा दारात माझ्या
जा, जरी म्हटले तरीही जात नाही
भूक आहे केवढी धाकात माझ्या
मी तिथे नसतो तरीही आळ येतो
कोण असतो नेमका वेषात माझ्या
द्यायला ईमान आहे, जीव आहे
हेच शिल्लक राहिले कोषात माझ्या
वाचले, भारत खरा गावात आहे
गाव कोठे राहिले देशात माझ्या
फास दे वा पीक दे आता नियन्त्या
श्वास आहे पेरले शेतात माझ्या.
------------------------------------------
3.
भेटल्यावर खूप काही सांगतो हल्ली
एवढे तो काय लपवू पाहतो हल्ली.
ती अशी आतूर असते का निरोपाला?
संशयाला फार मी समजावतो हल्ली.
चोरली नक्कीच कोणी झोप त्याचीही
तो सकाळी रोज डोळे चोळतो हल्ली
'बोचते आहे' म्हणे ती मौन धरले की
बोललो की बोलते मग 'बोलतो हल्ली'!
वेळ तू नात्यास नाही देत म्हणते ती
मनगटावर मी घडी तर बांधतो हल्ली
''यारहो, पाहून घ्या तुमचे तुम्ही आता''
कोण इतके स्पष्ट सांगा बोलतो हल्ली.
फक्त मी 'चालू' म्हणालो एकदा त्याला
तो मला सोडून चालू लागतो हल्ली
सोडला माझ्यातला साधेपणा जेव्हा
मी जगाला एक अडसर वाटतो हल्ली
वाकला नाही जिथे वाकायचे होते
तो अता नाही तिथेही वाकतो हल्ली
0 टिप्पण्या