============================
एक पोरगी खूप खूप साधी होती
दुनियेला नंदनवन म्हणणारी होती
काल तुला जो चुना लावला गेला ना
चुना नव्हे , चंद्रावरची माती होती!
तिला पाहिले..क्षणात झालो निरभ्र मी
एक ओढणी फिक्कट आकाशी होती
मी त्या प्रत्येकाची माफी मागितली
ज्या कोणावर माझी नाराजी होती
फलाट गेला निघून त्याच्या गावाला
तिथे उभी होती ती तर गाडी होती
तुला एक विठ्ठल दाखवलेला बघ मी
ती माझ्या आनंदांची चावी होती
============================
स्नेह माझातुझा सांगण्यापावता राहिला शेवटी
हुंदका पूर होऊन डोळ्यांंमधे दाटला शेवटी
साधता येत नव्हती तुझ्यासारखी शुद्ध निर्लेपता
फक्त रंगच तुझ्यासारखा मी मला फासला शेवटी
मी जरा आरसा पाहिला अन जरा चेहरा पाहिला
आरशाचाच पण मी तडा अन तडा सांधला शेवटी
जन्म सारा, उगाळू-उगाळून परिणाम झाला असा
चंदनासारखा गंध आलाच आला तिला शेवटी
खूप उपकार केलेत नाॅस्टॅल्जियाने तसे आजवर
आजचाही दिवस त्याच आगीत मी जाळला शेवटी
थांबलो पण मला थांबल्यासारखा फील येईचना
एक झोका तुझ्या नावचा मी मनाला दिला शेवटी
============================
वास्तवापासून आलो दूर मी
गाठले भलतेच पंढरपूर मी
पाहतो आहे मला हा आरसा
दाखवत आहे मला निष्ठूर मी
मी अता सिगरेट नाही प्यायलो
प्यायलो हा जाणिवांचा धूर मी
आजची रिपरीप नाही झेपली
आठवत होतो तुझी भुरभूर मी
भेटली , गांभीर्य लपवत राहिली
मी लपवले की किती आतूर मी
ऐकणारा कान नाही शोधला
शोधला नुसता स्वतःचा सूर मी
देव तू ! उरल्या युगांची वाट बघ !
चाललो होऊन क्षणभंगूर मी
============================
एकेजागी मन बसले की पुढे जात नाहीच मुळी
जणूकाय ते आयुष्याच्या प्रवासात नाहीच मुळी
म्हणे तुझ्या इच्छेविण साधे एक पान हलणे नाही
तरी जगाच्या पतनामध्ये तुझा हात नाहीच मुळी !
एक मतांचा प्रवाह आहे तुझा , एक माझा आहे
नदीत ह्या पण कुणी कुणाच्या विरोधात नाहीच मुळी
एक दिखाऊ चर्वितचर्वण करत राहतो तो नुसते
काळ कधी माझ्या दुःखांचे चणे खात नाहीच मुळी
जरी पाळलेला आहे पण सिंहच तो , खाणार तुला !
तळवे चाटत बसणे त्याच्या स्वभावात नाहीच मुळी
मी तर आपखुशीने माझे उदास गाणे वाजवले
तिला वाटले माझे काही सुशेगात* नाहीच मुळी
साठ वॅटच्या बल्बामधल्या 'उन्हेरात' जी मजाय ना
तशी मजा ह्या एल् ई डीच्या उजेडात नाहीच मुळी
तुझ्या आतल्या तुझ्याशीच तर तू बोलत आहेस खुळ्या
विठ्ठल नावाचा कोणीही तुझ्या आत नाहीच मुळी
============================
एक मिसरा दिपून आलेला
जन्म अंधारवून आलेला!
गंध उधळायचे तिला होते
आज वारा थकून आलेला
भरकटत राहिला चुकत गेला
एक रस्ता वळून आलेला
नाव सोडायला नको होती
डोह नव्हता भरून आलेला
मी उन्हाळा जवळ करत होतो
आणि लाडात जून आलेला
आज तुटलोच हे बरे झाले
छान धागा जुळून आलेला
एक विठ्ठल असा हवा होता
"आज येतो" म्हणून..आलेला!
============================
अपयशाची कारणे शोधू शकत नव्हता
तो जगाशी चांगले वागू शकत नव्हता
मी मनाची हद्द ओलांडू शकत नव्हतो
मीपणा माझा मला सोडू शकत नव्हता
छान गुंतागुंत होती जन्म-मरणांची
ते तुझे जाळे कुणी तोडू शकत नव्हता
मी अशा मेघाजवळ मन मोकळे केले
एकही संदेश जो वाहू शकत नव्हता
मी तुझ्या रंगात इतका रंगलो होतो
रंग दुःखांचा मला लागू शकत नव्हता
ओल अर्थांनी अशी माझ्यात झिरपवली
स्पंज शब्दांचा जिला शोषू शकत नव्हता
ह्याचसाठी टाळला मी 'मंदिरामधला'
तो मला माझा कधी वाटू शकत नव्हता
============================
भाव सोन्याएवढा आहे किराण्याला
पाहिजे आहे तश्यातच लाच वाण्याला
नाच तू , आहे जरीही ही हुकुमशाही
लोकशाहीचीच आहे चाल गाण्याला
बालपण होते जिवाला गारवा होता
पाच पेपरमिंट होत्या चार आण्याला
होरपळ होऊनही हसतात हे मासे
लावली कोणी अशी ही आग पाण्याला
थेंबभरसुद्धा निघेना तेल सत्याचे
जुंपले आहेत कुठले बैल घाण्याला
विठ्ठलाचे शेर करणारा कवी आहे
पोक नाही येत माझ्या ताठ बाण्याला !
============================
त्यांचे विचार केवळ ,आहेत संयमी
त्यांच्या कृती-बितींची मागू नका हमी
आत्ता कुठे जराश्या रक्ताळल्या दिशा
(खेळाल तेवढी ही रंगेल पंचमी !)
मातीच यार बहुधा ही राजकारणी
अश्वासनेच उगवुन येतात नेहमी
रडशील काय तू जर हे रोजचे मढे
करशील काय तू , ही पाहून बातमी
झेपेल ना तुला हा आकांत विठ्ठला
येतोस तू खरा की आणू तुझा डमी
============================
ही उदासीचीच पहिली पायरी , नाही ?
एवढी सलगी स्वतःसोबत बरी नाही
घागरीच्या घागरी केल्या रित्या असत्या
पण विषाचा हौद ह्या नाथाघरी नाही
दोन शिखरांगत कथा आहे तुझी माझी
आपल्या हातात ही मधली दरी नाही
दोष जर असलाच तर असणार दोघांचा
दोष हा एकाच कोणाचातरी नाही
ह्या अश्यावेळी इथे असणे तुझे, म्हणजे..
लेक माहेरीच आहे सासरी नाही
आज जी अफवा उडाली ती म्हणत होती
काल जी अफवा उडाली ती खरी नाही
आपल्या नशिबात नाही एकही राधा
आपल्या ओठात बहुधा बासरी नाही
झाड हे माझे भुता सोडून जा वेड्या
पंढरी नाही तुझी मी पंढरी नाही
============================
आपला 'आहेपणा' विसरायला तर पाहिजे
का नको म्हणतोस तू जर 'प्यायला' तर पाहिजे
आपल्यामध्ये तसा संपर्क नाही राहिला
पण तुला ही गोष्ट मी कळवायला तर पाहिजे
जग कधीपासूनचे समजावते आहे मला
(मी 'जगामधला' मला समजायला तर पाहिजे !)
पांढरा आहे खडू अन पांढरा आहे फळा
रेघ ही अस्पष्ट , पण उमटायला तर पाहिजे
ही नदी आहे तरी थांबायचे आहे हिला
डोंगराला वाटते सरकायला तर पाहिजे
जो उभा आहेस माझ्या आतल्या गर्दीत तू
शोध मी घेईन पण हरवायला तर पाहिजे
============================
झाडातून उगवले नंतर ?..जे निजले झाडांखाली ?
ज्यांना विमान आले ते दिसतिल का मग ताऱ्यांखाली?
दूध नव्हे हे , शिळ्या कढीला ऊत आणलेला आहे
मेथीचे काही दाणे तर येणारच दातांखाली
स्पर्धेचे नियमच इतके जाचक की स्पर्धक टिकू नये
वरून काही छुप्या अटीसुध्दा होत्या नियमांखाली
एका चिमणीने त्यावरती चोच मारली अन फुटला
गरुडाचा आकाश दडवल्याचा फुग्गा , पंखांखाली
टक लावून बघावे इतके सुंदर सीन सुरू होते
त्यात खलल , जे भाषांतर होते त्या त्या दृश्यांखाली
डोक्यावर जे होते त्यांना त्यांचे ऊन्ह कुठे होते
त्यांना काया नव्हती जे होते माझ्या हातांखाली
विठ्ठल डगमगला होता पण धीर पुन्हा आला , जेंव्हा -
वीट म्हणाली मी आहे खंबीर तुझ्या पायांखाली
============================
येत नाहीच मीपणा आता
मी स्वतःच्यात पाहुणा आता
पेन म्हणते तुझी गरज नाही
काय करशील टोपणा आता
रेष लांघून ,आजच्या काळी..
राम जातोय ! लक्ष्मणा , आता ?
बेशरम व्हायलाच आलो मी
मार तू मार टोमणा आता!
ही मला "जौन"ची नशा चढली
चंद्र वाटेल "चांदणा" आता
वाकण्याचा सराव तर झाला
छान मोडेल ना कणा आता ?
ही प्रतीक्षा फळास येऊद्या
विठ्ठला..याच साजणा आता!
============================
शेर शुभ्र होण्याची काय शक्यता आहे
जर तुझ्या विचारांचा रंग तांबडा आहे
बोट लावण्याची मी फक्त कल्पना केली
जग तरीS म्हणाले..हा एक 'गुदगुल्या' आहे
काल रात्र होती ती फक्त टोक होती तर !
आजचा दिवस म्हणजे एक बोगदा आहे ?
वेगळ्याच कोणी ही आग लावली आहे
वेगळ्याच कोणाचा हात भाजला आहे
मी तुझ्या दिशेने जी वीट फेकली होती
आज त्या विटेवरती कोण हा उभा आहे
ह्या विसंगतीने तर आणली मजा सारी
'ध्येय' सोनचाफ्याचे ! 'प्राप्त' मोगरा आहे !
============================
खरोखर पाहिला होता असे म्हणतात सगळेजण
मलाही चेहरा होता असे म्हणतात सगळेजण
मला नुकसान म्हणजे काय हे माहीतही नव्हते
मला हा फायदा होता असे म्हणतात सगळेजण
मला पाहून जो अॅब्सर्ड अन गंभीरसा हसला
जगाचा आरसा होता असे म्हणतात सगळेजण
कणा अगदीच आता मोडला आहे समाजाचा
कधी तो वाकला होता असे म्हणतात सगळेजण
कसा गेला पुढे हे सांगता येणार नाही पण
प्रवासी वेगळा होता असे म्हणतात सगळेजण
तसेतर जागजागी फाटले होते म्हणे जाळे
तरी..! मासा नवा होता असे म्हणतात सगळेजण
पुन्हा वर पाहिले मी पण मला काही दिसत नव्हते
तुझा तो पायथा होता असे म्हणतात सगळेजण
============================
कुणीतरी सोबत चालावे इतकीही जागा नसते
पायवाट तर पायवाट असते ती हमरस्ता नसते
आजूबाजूला घडते ते खुणवत नाही असे नव्हे
मलाच हल्ली गझला-बिझला लिहिण्याची इच्छा नसते
देवाच्या 'नसण्या'वर ती जर नसेल शंका घेत कधी
कसे म्हणू की नास्तिकता एक आंधळी श्रद्धा नसते
जगणे म्हणजे अमुक-तमुक हे म्हणणे म्हणजे फोलपणा
जोवर तुमच्यापाशी 'तुमची' मरणाची व्याख्या नसते
परिघावर राहून मला मी केंद्रामध्ये अनुभवले
मला समजले , तुझ्या वर्तुळाला त्रिज्या-बिज्या नसते
============================
तुला जो सावळा माहीत आहे
मला तो पांढरा माहीत आहे
तुला बस चंद्रमा माहीत आहे
मला ग्रहमालिका माहीत आहे
तमाचा भोपळा !.. माहीत आहे?
प्रकाशाचा विळा !.. माहीत आहे?
कधीकाळी इथे राहायचो मी
मला हा बंगला माहीत आहे
रिकामी दोन गावे, एक रस्ता
कुणाला हा तिढा माहीत आहे?
तुझी श्रद्धा मला माहीत आहे
(तुझा बुरखा मला माहीत आहे!)
मला माहीत आहे काच माझी
मला धुरळा तुझा माहीत आहे
कधी तू स्थिरयमक टाळून बघ ना
तुलातर ही मुभा माहीत आहे
============================
नव्यानेच झाल्या दुःखांना जुने काफ़िये वापर तू
अजून काही शेर करूनच टाक तुझ्या दुःखांवर तू
दुनिया पोट झाकण्यासाठी छान वस्त्र शोधत होती
पण नशिबाने तिला मिळाली ती विरलेली चादर तू
पतंजलीच्या मार्केटिंग्-वर जनता बेहद खुश आहे
तुझ्या क्वालिटीला चिकटुन मागे पडलेला डाबर तू
तरी तुला म्हणतात लोक तू उद्धट तू माणुसघाणा
तुझ्या इगोचे नाटक तर केलेले सविनय सादर तू
जरा पुढे गेल्यावर मागे वळून बघ , नाहीतर बघ..
विसरशील परतीच्या वाटा फार पुढे गेल्यावर तू
मला पुढे आणून विठ्या मी तुझी लाज झाकत आलो
तुझा पांढराशुभ्र शर्ट मी माझी मळकी कॉलर तू
============================
काय करू ही प्रसन्नता मन भकास झाल्यावरती
काळ सुखाचा दिलास पण फार त्रास झाल्यावरती
एक ओळ सुचण्याइतकाही हुरूप नसतो हल्ली
(हीच ओळ सुचली पण पुरता उदास झाल्यावरती)
विकसित होण्याच्या वाटेवर शून्य लागले हाती
विकास केला नाही मी हा विकास झाल्यावरती
कडू तिखट खारट आहे त्यामुळे चालते माझे
जिव्हेला लागतील मुंग्या मिठास झाल्यावरती
कुठल्याही वस्तूंना असता हात लावता आला
स्पर्श मनांना केला पण! .. मी मिडास झाल्यावरती
शब्दपिकाच्या राखणीत मी कमीच पडलो होतो
तुझ्या कृपेने अर्थ प्रकटलाच रास झाल्यावरती
आहेसच तू आहेसच हे कबूल करतो आता
काय करू मग तुझा रोज रोज भास झाल्यावरती
============================
ऐक इतकेच साकडे माझे
टाक लिंपून हे तडे माझे
वाटते तर नकोस ना पाहू
दुःख आहेच नागडे माझे
आतल्याआत रिक्त पाझरते
एक आकाश तांबडे माझे
एकदाचे अता हसे व्हावे
ऐकतो रोज मी रडे माझे
वाट माझीच वेदना माझ्या
पाय माझेच हे खडे माझे
का तुला आठवून बघतो मी
काय आहे तुझ्याकडे माझे
============================
ओळ तुझ्या जमिनीमधली माझ्या आकाशी आली
यमनाच्या गाण्यात सुरावट भीमपलाशी आली
पस्तिसच्या टप्प्यावरही मी धापा टाकत आलो
ते कुठल्या मार्गे गेले ज्यांना पन्नाशी आली
मी ज्याला पर्सनल कळवली त्याने ती दुसऱ्याला...
हिंडत हिंडत लिंक पुन्हा ती माझ्यापाशी आली
मित्रांच्या लेकी एव्हाना दिल्या घरी रुळल्याही
तो विचार करतो आहे , मुलगी हाताशी आली
फुला तुझ्या ह्या फूलपणाला हृदयातून शुभेच्छा...
( फूलपाखरे गेली आता गांधिलमाशी आली ! )
ह्यासाठी सोडून दिली मी वीट व्हायची इच्छा
वीट व्हायचे तर माझ्यावर तुझी मिराशी आली!
============================
ही तुझी पंढरी कुठे आहे
आणि मी वीटही कुठे आहे
एक मी बांध घातला होता
ही नदी , ती नदी कुठे आहे
काळजीने दुखावशील मला ..
(पण तुला काळजी कुठे आहे ! )
शुद्ध येते सकाळ होताना
ही नशा वेगळी कुठे आहे
जिंदगी छान चालली आहे
पण अशी चालली कुठे आहे
कालचा काल मी कुठे होतो
आजचा आज मी कुठे आहे
खूप समजावतो मनाला मी
"आपली लायकी कुठे आहे"
============================
श्वास हवा होता तेंव्हा मी चक्क खकाणे मागितले
वेड जरी मागितले तेही दीडशहाणे मागितले !!
दोष व्यवस्थेचा नाही हा दोष खरा तुमचा आहे
खोट्या बाजारात तुम्ही सत्याचे नाणे मागितले
काय काय खाऊ नक्की हे मलाच आता समजेना
एकच होती चोच मला , मी बरेच दाणे मागितले
देतानाची दानत बघ अन घेतानाची मिजास बघ
एक शेर मी दिला तुला , बदल्यात उखाणे मागितले
काळ म्हणालेला त्यांना मी म्हातारा झालो आहे
तरी नव्या लोकांनी त्याला नवीन गाणे मागितले
खारे दाणे विकणारा त्या क्षणी स्वतःवरती रुसला
कुण्या चिमुकलीने जे त्याला गोड फुटाणे मागितले
तुझ्याप्रमाणे बनायची मी अशी कामना बाळगली
'तुलाच' मागितले पण 'माझ्या मनाप्रमाणे' मागितले
©वैभव वसंतराव कुलकर्णी
============================
0 टिप्पण्या