[ women's day special marathi shayari ]
![]() |
| |Women's day marathi shayari | |
समजू नकोस क्षुल्लक काडीसही कधी तू
ठिणगी तिची पुरेशी औकात समजण्याला
©जयश्री कुलकर्णी
जगण्याच्या रंगमहाली इच्छांचे झुलते झुंबर
चिंतांना उडवित जगतो मनमौजी,मस्तकलंदर.
©अल्पना देशमुख-नायक
सदैव कोरडीच मी पावसात राहिले
कळेच ना अशी कशी ह्या जगात राहिले
©आशा_पांडे
जिथे न्यून आहे सुगंधी फुलांचे
तिथे कंटकांची प्रजा होत जाते
©आरती पद्मावार
निर्जीव पत्थरावर, मन भाळले कितीदा
त्याच्या सभोवताली, घोटाळले कितीदा
© अरु_तनया
तुला एवढा जीव लावला चुकले माझे
उगीच माझा जीव जाळला चुकले माझे
©अनघा अनघा
मला दु:ख दे, दु:ख दे, दु:ख देवा
सुखाने जळावे असे दु:ख देवा
©बागेश्री देशमुख
वाटेत मुलाच्या वृद्धाश्रमात झिजते आई
कान्ह्याविण त्या जशी देवकी दिसते आई
©चित्रा कहाते
डोळ्यांत आसवांचा हा कोणता पहारा
रोमांचितो ऋतू अन् अंगावरी शहारा.
©चंदना सोमाणी.
आज जिंकण्यास तू
खेळ डाव खास तू
©छाया गोवारी
दिवाणखाने भकास झाले
कुणी न अंतर्मनात भेटे..
©धनश्री किशोर पाटील
मी कशाला दाखवू हे सोसलेले घाव सारे
येथल्या मी सांत्वनाचे पाहिले लीलाव सारे
© दीपमाला कुबडे
पसरली आज वाऱ्यावर किती चर्चा.
तुझ्या माझ्या करारावर किती चर्चा
©दिप्ती सुर्वे जाधव
उतरली तिच्या ओल डोळ्यात काही
ढवळले कुणी खोल डोहात काही?.
©अन्वी अनिल आठलेकर
अद्याप काळजाशी जपलेत वार काही
शत्रूत मोजते मी माझेच यार काही
© अमृता साळुंके जोशी
जीव ओवाळून टाकावा तुझ्यावर
एक होवू दे , जखम माझ्या मनावर
©अश्विनी विटेकर
ना भेदभाव कुठला ना जातपात राहो
देशात बांधवाचे हातात हात राहो
©अनिता बोडके
रिते कुंभ झाले रित्या या पखाली
कुठे पेटवाव्या सुखाच्या मशाली
©अलका देशमुख
सत्य सोडुनी दूर धावते त्या स्वप्नाचे काय करू मी
स्वप्नांना जे वाव न देते त्या सत्याचे काय करू मी
©डॉ.अमिता गोसावी
विस्कटले घर कसेबसे आवरता येते
विस्कटले मन पुन्हा सजवणे सोपे नसते.
©अश्विनी आपटे
गेला पाऊस अगदी नुकता नुकता
भरून आला श्वास पुरातन नुकता नुकता
©अनुराधा_साळवेकर
लिहिलेल्या ओळींची गझल झाली पाहिजे
सोसलेली वेदना सफल झाली पाहिजे.
©दीपाली कुलकर्णी
संकटांचा आज सरला प्रहर बाई
भोगलेले, सोसलेले विसर बाई.
©फातिमा_मुजावर
घडलेच असे काही की, प्रश्नात अडकले नाही
उत्तरे मिळवण्यासाठी नजरेत उतरले नाही
©बावरी
स्वप्नांच्या वाटेवर जगणे जमले नाही
सत्याला सामोरे जाणे जमले नाही..
©ज्योती_मार्जनी
ना तिला घर दार वा ना कोणताही सातबारा
काढला आहे कुणी का माळरानाचा उतारा ?
© ज्योत्स्ना चांदगुडे
माझिया गात्रामधूनी धावणारा श्वास तू
की मला बेचैन करणारा मनाचा भास तू ?.
©गाथा जाधव
वेदना जेव्हा उरी गर्भार होते
कागदावर मग गझल साकार होते
©सौ. हेमलता पाटील.
सरसरते स्वप्न कसे तापतात आजही
सळसळते रक्त कसे तापतात आजही.
©हंसिनी उचित,
उत्तरासाठीच होता प्रश्न तो मी मांडला
जो शिताफीने असा तू ऐनवेळी टाळला.
©ज्योती_रत्नाकर_राव_बालिगा
हे बंध रेशमाचे सोडून टाकले मी
नावापुढील नावच खोडून टाकले मी
©सौ .ज्योत्स्ना राजपूत
घेते अशी परीक्षा अंदाज येत नाही
नियती कधी कुणाला पर्याय देत नाही
©जयश्री कुलकर्णी
विरक्ती जराशी तुलाही मलाही
शिसारी सुखाची तुलाही मलाही
©जयश्री अंबासकर
हे गझलवेड माझे माझा परीघ आहे
आरंभ हाच होता, येथेच अंत आता
@क्रांति साडेकर.
ओठ रंगवुन खिडकी बसली
रस्ता जेव्हा दलाल झाला
©कविता क्षीरसागर.
सौदामिनी नभीची साकार होत आहे
हर एक श्वास माझा एल्गार होत आहे .
©किर्ती वैराळकर इंगोले
ज्यांच्या मनात आहे काळोख दाटलेला
त्यांच्यासवे कसा हा आम्ही प्रवास केला
©कविता डवरे लाहुडकर
शिंपला कोणी सडा हा चांदण्यांचा अंबरी
ओंजळीभर वेचुनी घ्यावा बघा कोणीतरी
©सौ. किरण पिंपळशेंडे
खरेच माझा जगावयाचा विचार होता
कुणीतरी पण खुडून नेला बहार होता
©काश्मिरा पाटील.
ठेवला विश्वास होता मी पुन्हा या पावसावर
व्हायचे जे, तेच झाले घात झाला पेरल्यावर
©कांचन कानतोडे
आले जमून सारे आसू उनाड माझे
डोळ्यातल्या सरींना उघडे कवाड माझे.
©ललिता_बांठिया
कित्येक वादळांना मी बंदिवान केले
दु:खास रोज माझ्या आयुष्यमान केले.
©क्षितिजा आरती
जिथे पाखरांचे थवे पाहिले मी
तुला पाखरांच्या सवे पाहिले मी
©मीना_शिंदे
आज माझ्या वेदनेला काय मोठा भाव आला
प्रेत माझे देखण्याला यच्चयावत गाव आला
©मेघा देशपांडे

0 टिप्पण्या